संगमनेरच्या आमदारांचे धाडस, मध्यरात्री पकडले वाळू तस्कर

1 min read

संगमनेर दि.६:- प्रशासनाला न जुमानता संगमनेरमध्ये वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. तालुक्यातील सर्व नद्यांची पात्र वाळू तस्करांचे अड्डे झाले आहेत. आमदार अमोल खताळ यांनी दि.४ रात्री स्वतः वाळू तस्करी करणाऱ्या डंपर पकडून दिले.

विशेष म्हणजे आमदार खताळ यांनी अद्याप पर्यंत दोनदा वाळू तस्करांना पकडून प्रशासनाच्या स्वाधीन केले, तरी देखील वाळीत तस्कर कोणालाच जुमानला तयार नसल्याचे समोर आले.

मध्यरात्रीच्या सुमारास एक कार्यक्रम आटोपून आमदार खताळ संगमनेरकडे येत होते. तालुक्यातील समनापुर येथे साठवून ठेवलेली वाळू डंपरमध्ये भरून घेऊन जात असताना रायतेवाडी शिवारातील तनपुरवाडी रस्त्यावर आमदारांनी पाहिले.

त्याचक्षणी स्वतः आ. खताळ यांनी आपले वाहन थांबवत खाली उतरत डंपर चालकाकडे विचारपूस करत चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी डंपर चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली.

आमदारांनी ही माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना भ्रमण ध्वनी वरून देत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महसूल व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

पथकाने वाळूने भरलेला १० लाख रुपये किमतीचा डंपर आणि १५ हजार रुपये किमतीची ३ ब्रास वाळू असा एकूण १० लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत संगमनेर शहर पोलिसात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी डंपर चालक अरबाज इसाक इनामदार ( वय 24 वर्षे, रा. सावरगाव घुले. ता. संगमनेर), शुभम सारंगधर वामन (रा. कोल्हेवाडी ता. संगमनेर )

व गोरख हासे (रा. समनापुर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भांगरे हे करत आहेत.

संगमनेर तालुक्यातील प्रवरा, मुळा नदीपात्रातून राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर बाळू तस्करी चालते. यावर कोणी कितीही आवाज उठवला, तरी तेवढ्यापुरती चार दोन दिवस तस्करी थांबते आणि पुन्हा पूर्ववत सर्व उद्योग चालू होतात.

दीड, दोन महिन्यापूर्वी आमदार खताळ यांनी जोर्वे नाक्याजवळ वाळूने भरलेली जीप पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केला होती. आमदार खताळ यांनी एकूणच बेकायदा उद्योगांबाबत पोलीस, महसूल प्रशासनाची बैठक घेत सक्त कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यावरही वाळू तस्करी चालूच असल्याचे कालच्या कारवाईने अधोरेखित झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे