पुण्यात तब्बल १११ ‘पाकिस्तानी’ पासपोर्ट धारक वास्तव्यास!
1 min read
पुणे दि.२६:- केंद्र सरकारने ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्यास सांगितले आहे. पुणे शहरात सुमारे १११ पाकिस्तानी पासपोर्ट असलेले नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे.पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने परराष्ट्र मंत्रालयामार्फत देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. बुधवारी केंद्र सरकारने ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्यास सांगितले आहे. शहरात सुमारे १११ पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने लाँग टर्म व्हिसावर असलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश सर्वाधिक आहे. त्यासह व्हिजिटर व्हिसावर आलेले पाकिस्तानीदेखील काही प्रमाणात शहरात आहेत.गुरुवारी त्यातील ३ पाकिस्तानी नागरिकांनी पुणे पोलिसांकडून एक्झिट पत्र घेऊन, शहर सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क या परिसरांमध्ये हे नागरिक वास्तव्यास आहेत.पहलगाम येथे मंगळवारी (दि. २२) दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे.
अटारी-वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तत्काळ बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. तिथून प्रवेश केलेल्या पाकिस्तानी नागरिकांना १ मेपर्यंत मायदेशात परत जाता येईल, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.
परदेशी नागरिकांची असते पोलिसात नोंद
-परदेशातून आलेल्या कोणत्याही नागरिकांना ते ज्या शहरात जातात, तेथील जवळच्या पोलिस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयात नोंद करावी लागते तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे असेल तरी तशी नोंद करावी लागते. याशिवाय वेळोवेळी पोलिसांकडून परदेशी नागरिक त्यांनी दिलेल्या पत्त्यावर वास्तव्य करत आहेत ना, ज्या कारणासाठी ते आले आहे, त्याव्यतिरिक्त इतर काही करत नाहीत ना, याची तपासणी केली जाते.-पुण्यात आलेल्या १११ पाकिस्तानी नागरिकांपैकी बहुतांश नागरिक दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले आहेत.
दीर्घ मुदतीचा व्हिसा हा पाच वर्षांसाठी दिला जातो. त्यानंतर दर दोन वर्षांसाठी तो रिन्यू केला जातो तर, व्हिजिटर व्हिसा ४५ ते २० दिवसांसाठी दिला जातो. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी ३५ पुरुष आणि ५६ महिला या दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात आले आहेत तर २० पाकिस्तानी व्हिजिटर व्हिसावर आले आहेत.
-केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्याचे आदेश दिले असले तरी याबाबत अद्याप परराष्ट्र विभागाकडून कोणतीही एसओपी आलेली नाही, असे पुणे पोलिसांनी सांगितल.