मेंढ्या चारताना अभ्यास अन् फिरत फिरत शिकला; UPSC परीक्षेत मेंढपाळ बिरदेव सिध्दापा डोणे झाला IPS;स्वप्न साकार

1 min read

कोल्हापूर दि.२५:- खांद्यावर घोंगडे, डोक्यावर टोपी, पाणी पिण्यासाठी लोकरीचा काचोळा काखेत मारून, पायात जाडजूड पायतान, मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती, वर आभाळ…खाली धरती हेच आपले घर माणून जीवन कंठणाऱ्या एका मेंढपाळाच्या मुलाने अथक प्रयत्नातून आयपीएस अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे. तो ही परीक्षा पास झालेला निकाल ऐकण्यासाठी सुद्धा गावी नव्हता.2024 मध्ये केंदीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत कागल तालुक्यातील यमगे येथील मेंढपाळाचा मुलगा अवघ्या 27 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात 551 रँकने उत्तीर्ण झाला. त्यामुळे बिरदेव हा कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल (मंगळवारी) दुपारी जाहीर झाला. त्यामध्ये बिरदेव उत्तीर्ण झाल्याचे समजताच त्याच्या जन्मगावी यमगे येथे बिरदेवच्या अनुपस्थितीत जल्लोष करण्यात आला. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल समजताच कागल तालुक्यातील यमगे येथे त्याच्या गावी मित्र परिवाराने जल्लोष केला.मात्र, बिरदेव हा बेळगाव जिल्ह्यातील एका खेडेगावात आपल्या मामांच्या मेंढ्यासह आपल्या मेंढ्या एकत्रित करून मेंढ्याची राखण करत होता. मेंढ्यांची केस पावसाळ्याच्या अगोदर कटिंग केली जातात. केस कटिंग करत असताना त्याला फोन आला. ‘बिरुदेव, तू यूपीएससीची परीक्षा पास झालास…’ हे ऐकताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र, निकाल गावात बिरूदेव रानात अशी स्थिती झाली. बिरुदेव हे कागल तालुक्यातील यमगे गावचे सुपुत्र आहेत. इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असताना बिरदेवने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सहभागी झाला होता. पण त्यामध्ये अपयश आल्याने त्याने खचून न जाता मोबाईल, टीव्ही व खेळ यापासून अलिप्त राहत जिद्दीच्या जोरावर केवळ अभ्यासाला महत्व दिले. बिरदेव हा सुरुवातीपासूनच हुशार होता.त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये मुरगूड केंद्रात सर्वप्रथम आला होता. गणित विषयात त्याला या दोन्ही परीक्षेत शंभरपैकी शंभर गुण मिळाले होते. बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदिर या शाळेत पूर्ण केले. तर माध्यमिक शिक्षण जयमहाराष्ट्र हायस्कूल यमगे येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले तर इंजिनिअरिंगची पदवी पुण्याच्या सीओईपी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर बिरदेवने दिल्लीमध्ये आयपीएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे क्लास सुरु केला. या ठिकाणी त्याने दिवसातून 22 तास अभ्यास करत परीक्षेची तयारी केली. दिल्लीत आयएएस क्लासेसमध्ये परीक्षेसंबधी मार्गदर्शन घेतले. त्यानंतर जोरदार अभ्यासाची तयारी केली. दिल्लीत अभ्यास पूर्ण करून परीक्षा दिली. अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने यश संपादन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे