सोन्याच्या दर वाढला; सोने होणार ‘लाख’ मोलाचे

1 min read

नवी दिल्ली दि.२२:- चीन आणि अमेरिका या दोन बलाढ्य अर्थव्यवस्थामध्ये व्यापार युद्ध वाढले आहे. अशा परिस्थितीत जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोमवारी सोन्याचा दर तब्बल १,६५० रुपयांनी वाढून ९९,८०० रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. अमेरिकेच्या व्यापार युद्धामुळे अमेरिकेचा डॉलर कमकुवत होत असल्यामुळेही सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरकेंद्री वित्तीय उत्पादनांऐवजी सोने आणि चांदीकडे गुंतवणूक वळत असल्याचे विश्लेषकानी सांगितले.दिल्ली सराफात चांदीचा दर ५०० रुपयांनी वाढून ९८,५०० रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार देशातील गुंतवणूकदार आणि दागिने उत्पादक सोन्याची मागणी वाढवत असल्यामुळे भारतातही सोन्याच्या दरात वेगाने वाढ होत राहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प व्यापार युद्ध संपुष्टात आणत नाही. तोपर्यंत सोने आणि चांदीची मागणी वाढत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.परिस्थिती अनिश्चित असल्यामुळे देशातील आणि परदेशातील वायदे बाजारामध्ये सोन्याचे दर वाढत आहेत. याचा अर्थ लघु ते मध्यम पल्ल्यात सोने उच्च पातळीवर राहण्याची जास्त शक्यता आहे. जागतिक पातळीवर सोन्याचा दर ८० डॉलरने म्हणजे २.४ टक्क्यांनी वाढून ३,४०० डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर गेला. एकूण परिस्थिती पाहता दागिन्यांऐवजी गुंतवणूक म्हणून सोन्याला मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत भारताची सोन्याची आयात वाढली आहे. यामुळे भारताच्या चालू खात्यावरील तुटीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.४ महिन्यांत २५ टक्के वाढ एक जानेवारीपासून सोन्याच्या दारात तब्बल २५% वाढ झाली आहे. तर २ एप्रिल पासून सोन्याच्या दरात ६% वाढ झाली आहे. कोटक महिंद्रा एएमसीचे फंड मॅनेजर सतीश धोंडापती यांनी सांगितले की, गेल्या एक महिन्यामध डॉलर कमालीचा कमकुवत झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे