धानोरा तहसीलदाराचा प्रताप मूलबाळ होत नाही म्हणून पत्नीला मारहाण, जादूटोणा; पोलिसांनी केली अटक; तहसीलदार न्यायालयीन कोठडीत

1 min read

गडचिरोली दि.१६:- मूलबाळ होत नाही म्हणून पत्नीला मारहाण करून पिस्तूल रोखणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील धानोऱ्यात कार्यरत तहसीलदाराला नांदेड पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अविनाश शेंबटवाड असे आरोपी तहसीलदाराचे नाव असून सध्या ते कोठडीत आहेत. अविनाश श्रीराम शेंबटवाड (३४) हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सध्या ते गडचिरोलीच्या धानोरा तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून सेवा बजावत आहेत. नांदेडच्या मगनपुरा भागात माहेर असलेल्या पत्नीच्या तक्रारीनुसार, आई- वडिलांनी त्यांचा विवाह दीड वर्षांपूर्वी अविनाश यांच्याशी थाटामाटात लावून दिला. लग्नात मानपान, सोने व अन्य साहित्य दिले होते. लग्नानंतर तहसीलदार पती अविनाश यांच्यासह कुटुंबीयांनी त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. कर्तव्याच्या ठिकाणी सोबत असताना काही ना काही कारण काढून मारहाण केली, तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलही रोखली, असा दावा पत्नीने केला आहे.या प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून नांदेड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तहसीलदार पती अविनाश शेंबटवाड यांच्यासह त्यांची आई, वडील व डॉक्टर असलेल्या दोन भावांविरुद्धही कौटुंबिक छळाचा गुन्हा ११ मार्च रोजी दाखल केला होता.अविनाश शेंबटवाड हे नांदेडात असल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना १३ एप्रिल रोजी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक जालिंदर तांदळे हे करीत आहेत. पतीचा त्रास वाढल्याने पत्नी नांदेडात माहेरी गेली होती. सासरी असताना मूलबाळ होण्यासाठी जादूटोण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप तिने केला आहे. कौटुंबिक छळासह अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे