निरोप समारंभाचं भाषण; अख्ख्या वर्गाला खळखळून हसवलं, बोलता-बोलता, ती खाली कोसळली; दुर्दैवी अंत
1 min read
धाराशिव दि.५:- धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. निरोप समारंभात भाषण करत असताना एका २० वर्षीय विद्यार्थिनीचा व्यासपीठावरच मृत्यू झाला आहे. मयत विद्यार्थिनी व्यासपीठावर हसत हसत भाषण करत होती. तिच्या भाषणातील मुद्दे ऐकून इतर विद्यार्थी खळखळून हसत होते.पण यांचा हा आनंद क्षणात विरला. व्यासपीठावरच तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्याच्या परंडा शहरातील रा. गे. शिंदे महाविद्यालयातील एक विद्यार्थीनी भाषण करता करताच चक्कर आल्याने खाली कोसळली.
त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. वर्षा खरात असे या मृत विद्यार्थीनीचे नाव असून ती बिएसीची वर्गात शिकत होती. या घटनेने महाविद्यालयासह शहर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. वर्षाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
प्रत्येक जण आपापल्या परीने जेवढा जमेल तेवढा अभ्यास करत असतो… असं बोलता बोलता तिने एक विनोद केला, ज्यावर अख्खा वर्ग खळखळून हसला. त्यानंतर शिक्षकांचं कौतुक करता-करता ती जागच्या जागी कोसळली. दरम्यान, हसता खेळता, निरोप समारंभाचे भाषण करतानाच विद्यार्थीनीने अखेरचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.