अवकाळी पावसाने ‘या’ जिल्ह्यांना झोडपलं; बळीराजा चिंतेत

1 min read

मुंबई दि.३:- राज्याला ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने झोडपलं आहे. राज्यातील विविध भागात कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गारपिटीसह बरसलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वर्धा, नंदूरबार, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला.वर्धा शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वर्ध्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर दुपारी वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसला. हवामान विभागाने पुढील 24 तासांत वर्धा जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला होता.अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान अवकाळी पाऊस बरसला. गंगापूरला तब्बल अर्धा तास पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा अवकाळीने नष्ट झाला.या अवकाळी पावसामुळे कांदा आणि मका पिकांच्या सर्वाधिक नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड दिसली. तर काही घरांचे पत्रे उडाले. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वारा, विजांचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. बागलाणमधील नवे निरपूर येथील शेतकरी राकेश सूर्यवंशी यांच्या राहत्या घरासमोर असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतला. वीज कोसळताना सुदैवाने घरातील सर्व जण बाजूला असल्याने कुठलीही हानी पोहोचली नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. नगरच्या संगमनेर आणि अकोले तालुक्याला पावसाने झोडपले. जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झालं आहे. काढणीस आलेला गहू भुईसपाट झाला. इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.संगमनेर तालुक्यातील पठारभाग आणि अकोले तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पावसाची हजेरी लावली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे