राज्यातील ‘या’ भागात आज अवकाळी पाऊस बरसणार; हवामान विभागाचा अंदाज
1 min read
मुंबई दि.१:- राज्यातील अनेक भागात आज अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील 20 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावासाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आज 1 एप्रिल 2025 रोजी, ठाणे, रायगड, रत्नगिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागने पावसाचा यलो अलर्ट जारी केली आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे कोकणातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान पावसाच्या शक्यतेमुळे कोकणात काढणी केलेला आंबा, काजू बी, कडधान्ये, व सुपारी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील आठ जिल्ह्यांना ‘ऑरेंज’, तर तीस जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये 88 ते 112 टक्के वळीव पडण्याची शक्यता असून, एप्रिल ते जूनदरम्यान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असाही अंदाज व्यक्त केला आहे. हिमालय ते उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे. तामिळनाडू राज्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील बहुतांश भागात वळवाला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. यात हिमालयापासून ते पूर्वोत्तर भारत, मध्य भारत, मध्य प्रदेश महाराष्ट्र ते दक्षिण भारत असा संपूर्ण देशात वळवाचा प्रभाव 1 ते 4 एप्रिल या कालावधीत राहील.
महाराष्ट्रात मात्र 1 ते 2 एप्रिल हे दोन दिवस सावधान राहण्याचे असतील; कारण या कालावधीत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.