पत्नीच्या अंगावर पाणी सांडल्याच्या रागातून भावाचा खून
1 min read
मंचर दि.२८:- पत्नीच्या अंगावर पाणी सांडल्याच्या रागातून सख्ख्या भावाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना बुधवारी (दि. १९) मंचर (ता. आंबेगाव) हद्दीत सिद्धार्थनगर येथे घडली. याबाबत मयत सौरभ देठे यांच्या आत्याचा मुलगा स्वप्निल काळुराम जाधव यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सौरभ संजय देठे (वय २२) याच्या घरासमोर त्यांचा भाऊ रोहित संजय देठे याची पत्नी नंदिनी रोहित देठे ही कपडे धूत होती, तेव्हा तिच्या अंगावर सौरभ देठेकडून पाणी पडले. त्या वेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
अंगावर पाणी टाकल्याच्या रागातून रोहित देठे याने भाऊ सौरभ देठे याला शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच, चाकूने वार केले. यात गंभीर जखमी झालेला सौरभ देठे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रोहित देठे याच्यावर मंचर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी त्यास अटक केली. पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर करीत आहेत.