समर्थ संकुलात डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन
1 min read
बेल्हे दि.१३:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.प्रा.दत्तात्रय पायमोडे यांनी ‘कविता काही माझ्या, काही तुझ्या, गालावरच्या खळी पासून गर्भातील कळी पर्यंत’ या विषयावर विद्यार्थ्यांना विविध कवितांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. कवितेचे जीवनातील महत्व काय, प्रेरणादायी कविता, भावनिक कविता, उपदेश पर कविता,
स्फूर्तीदायक कविता यामुळे जीवनाला मिळणारी नवी उभारी, नवी दिशा आयुष्य सुंदर करण्यासाठी प्रेरणादायी ठरते. कवितेमुळे जीवन सुंदर होते. महाराष्ट्राचे साहित्यिक पु.ल.देशपांडे, मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचे वाचन यावेळी करण्यात आले.
डॉ.अजित आपटे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज व आधुनिक व्यवस्थापनाचे कौशल्य’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले’आजच्या युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर सकारात्मक दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.अनिल आपटे म्हणाले की, आजचा युवक हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे.
व्यक्तीची प्रतिष्ठा त्याच्या बाह्यांगावरून नव्हे तर अंतरंगावरून ठरते. नवीन बदलाच्या आव्हानांना कसे सामोरे जावे या साठी त्यांनी हिंदी गझला व कवितांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. वर्तमान युगातील बाजारवाद, फास्टफूड आणि मॉल संस्कृतीला कसे सामोरे जावे यासाठी त्यांनी ‘चुनौती’ ही कविता सादर करून.
उपभोक्तावादी प्रवृत्तीचे स्पष्टीकरण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आरोग्य, स्वावलंबन, सातत्य करण्याचा ध्यास, सकारात्मक विचार, नम्रता, सहनशीलता, धैर्य, जीवन कौशल्य, विज्ञान-तंत्रज्ञान, करियर, ग्लोबल वार्मिंग इत्यादी अनेक मुद्यांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ही व्याख्यानमाला म्हणजे जीवनाला वैचारिक कलाटणी देणारी कार्यशाळा असून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडण्यासाठी अनुकूल असल्याचे मत यावेळी डॉ.लक्ष्मण घोलप यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,
माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन प्रा. गणेश बोरचटे यांनी, प्रास्ताविक डॉ.उत्तम शेलार यांनी, तर आभार बहि:शाल विभागाच्या प्रमुख प्रा.हर्षदा मुळे यांनी मानले.