राज्यातील १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

पुणे दि.२१: – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावीची लेखी परीक्षा शुक्रवार (दि.२१) पासून सुरू होत आहे. राज्यातील एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. संपूर्ण राज्यात ५ हजार १३० केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागात लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होत आहे. ८ लाख ६४ हजार १२० मुले तर ७ लाख ४७ हजार ४७१ मुली ही परीक्षा देणार आहेत. तर १९ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांतील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २ हजार १६५ एवढी विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.राज्यात एकूण ५ हजार १३० परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असून यंत्रणा सज्ज आहे.

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. राज्य मंडळामार्फत प्रसिद्ध व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे लागणार आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे