बोरी खुर्द येथील प्रशालेत इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांना निरोप
1 min read
बोरी दि.१५:- बोरी खुर्द येथील गुरुवर्य ए.गो.देव प्रशालेतील इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना एस.एस.सी.बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा व निरोप देण्यात आला अशी माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक शमशुद्दिन पटेल यांनी दिली. फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या एस.एस.सी.बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वोन्नती मंडळाचे अध्यक्ष विक्रम शिंदे, सचिव नरहरी शिंदे, कार्याध्यक्ष बाजीराव बांगर, सुनील बेल्हेकर, भरत चिंचवडे, बाबाजी बांगर, रंगनाथ बांगर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आठवी व नववी मधील विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली व परीक्षार्थींना शुभेच्छा देत त्यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या.
दहावी मधील समीक्षा बांगर, अंजली गोंड, आकाश बांगर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. मुख्याध्यापक शमशुद्दीन पटेल यांनी यावर्षी पासून दहावी बोर्ड परीक्षेत झालेले बदल, कॉपीमुक्त अभियान, विद्यार्थ्यांची जवळच्या परीक्षा केंद्रावर झालेली सरमिसळ, कॉपीमुक्त अभियानासाठी बोर्डाची बैठे व भरारी पथके याबद्दल मार्गदर्शन केले.
कठोर मेहनत करा यश तुमचेच आहे असे सूचित केले. पुढील उच्चशिक्षणासाठी लागणारे मार्गदर्शन व मदत सर्व शिक्षक करतील अशी ग्वाही त्यांनी दिली.संस्थेचे अध्यक्ष विक्रम शिंदे यांनी परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी पुरेशी झोप, स्वतःचे स्वास्थ्य व आरोग्य, आहार याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले.
पुढील उच्च शिक्षण घेताना आपली आवड, क्षमता, आणि संधी या बाबींचा सूक्ष्म विचार करून योग्य शाखा निवडावी व आपले करिअर घडवावे. आपले आयुष्य घडवणारे शिक्षक व शाळा यांना नेहमी केंद्रस्थानी ठेवावे. मोठे होऊन गाव व शाळेचे नाव उंचावावे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे शिक्षक विजय चव्हाण, संजय धायबर, अमित शेटे, सोनल जाधव, हर्षदा जाधव, सेवक रवींद्र जाधव, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व माजी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सर्व नियोजन विद्यार्थ्यांनी केले. प्रास्ताविक श्रुती शिंदे, सूत्रसंचलन व आभार समीक्षा बांगर व अनुराग औटी या विद्यार्थ्यांनी केले.