दिल्लीत आम आदमी पक्षाचा ‘दारु’ण पराभव का झाला? ५ महत्त्वाची कारणे जाणून घ्या
1 min read
नवीदिल्ली दि.९:- दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं विजय मिळवला आहे. देशाच्या राजधानीत तब्बल 27 वर्षांनी भाजपाचं सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर आम आदमी पक्षानं (आप) सत्ता गमावली आहे. अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोसिया हे आम आदमी पक्षाचे सर्वात दिग्गज नेते देखील या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचा ‘दारु’ण पराभव का झाला? त्याची संभाव्य पाच कारणे जाणून घ्या.
दारु घोटाळ्याचा डाग?
स्वच्छ राजकारणाचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाला दारु घोटाळ्याचा डाग लपवता आला नाही. भाजपाने गेल्या तीन वर्षांपासून या प्रकरणात ‘आप’ ला लक्ष्य केलं आहे. या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांना जेलवर जावं लागलं. भाजपानं हा मुद्दा सातत्यानं उचलून धरला. या प्रकरणात कायदेशीर डावपेचांशिवाय आम आदमी पक्षाला कोणतंही स्पष्टीकरण देता आलं नाही. जनतेच्या कोर्टात त्याचा फटका आम आदमी पक्षाला बसला.
भ्रष्टाचाराचे आरोप?
आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झाल्यापासून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत होते. दारु घोटाळ्यासह दिल्ली जलबोर्ड घोटाळा हा प्रमुख होता. अंमलबजावणी संचालनालय या प्रकरणाची चौकशी करत आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते या प्रकरणात आरोपी आहे. भाजपानं आम आदमी पक्षावरील भ्रष्टाचाराचे आरोप मतदारांपर्यंत पोहोचवले.
मुख्यमंत्रिपदावर संभ्रम?
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल दारु घोटाळ्यात जेलमध्ये गेले होते. त्यांना जामीन देताना सर्वोच्च न्यायालयानं मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही फाईलीवर सही करता येणार नाही, असे आदेश दिले होते. त्यामुळे आम आदमी पक्षानं निवडणूक जिंकली तर कोण मुख्यमंत्री होणार? हा प्रश्न मतदारांना पडला होता. आतिशी कार्यवाह मुख्यमंत्री असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं होतं. दारु घोटाळ्याचा निकाल येईपर्यंत केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून कोणतंही काम करता येणार नाही, असं मतदारांना वाटलं. त्याचा थेट फायदा भाजपाला झाला.
नेत्यांचं पक्षांतर?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आम आदमी पक्षाच्या सात आमदारांनी पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी आपमधील अनेक कॅबिनेट मंत्री पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले होते. कैलाश गहलोत आणि राजेंद्र पाल गौतम हे यामधील प्रमुख नेते आहेत. हे दोन्ही नेते ऐकेकाळा आम आदमी पक्षाचे प्रमुख चेहरा होते. या पक्षांतराचा परिणाम मतदारांवरही झाला. आम आदमी पक्षात सर्व काही ठिक नाही, हे त्यांच्या लक्षात आले.
काँग्रेसची मतं वाढली?
या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. पण, पक्षाच्या मतामध्ये वाढ झाली. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार दुपारी 3 वाजेपर्यंत भाजपाला 45.80%, ‘आप’ला 43.79% तर काँग्रेसला 6.36 % मतं मिळाली आहेत. काँग्रेसला 2020 मधील निवडणुकीत 4.26 टक्के मतं मिळाली होती. पक्षानं या निवडणुकीत 2.10 टक्के मत वाढवण्यात यश मिळवलं. दिल्लीत आम आदमी पक्ष काँग्रेसची मतं घेऊनच शक्तीशाली बनला होता. पण, काँग्रेसच्या कामगिरीत थोडी सुधारणा होताच ‘आप’ची नाव बुडाली.