दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज निकाल; कोण होणार राजधानीचा किंग? आप की भाजप? आज स्पष्ट होणार
1 min read
नवीदिल्ली दि.८:- देशाची राजधानी असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अरविंद केजरीवाल हे विजयाचा चौकार मारणार की भाजप २७ वर्षांनी दिल्लीमध्ये सत्तांतर करण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. निवडणूक निकालापूर्वी भाजप आणि आप या दोन्ही पक्षांनी दिल्लीत विजयाचा दावा केला आहे. 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय राजधानीतील सर्व 70 विधानसभा जागांवर 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. दिल्लीत 60.54 टक्के मतदान झाले होते. 2020 च्या तुलनेत यावेळी दिल्लीत 2 टक्के कमी मतदान झाले आहे. निवडणुकीत 60.92 टक्के महिलांनी मतदान केले. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपचे सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर ते सत्तेवर परतले तर 27 वर्षांनी भगवा पक्ष सरकार स्थापन करेल.
मात्र AAP विजयी झाल्यास दिल्लीत चौथ्यांदा सरकार स्थापन होईलदिल्ली काबीज करण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडलंय. केजरीवाल यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही सत्ता राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलीय. एक्झिट पोलचा अंदाज पाहता भाजप सत्तेत येईल असा कयास आहे.
मात्र दिल्लीकरांनी कोणाला कौल दिलाय हे प्रत्यक्ष मतमोजणीतच समजेल. आठ वाजता आधी पोस्टल मतदानाची मोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएमची मोजणी होईल. दरम्यान, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी निकालाआधी लक्ष्मी नारायण मंदिरात पूजा देखील केली.