एकाही बांगलादेशीला महाराष्ट्रात ठेवणार नाही:- नितेश राणे

1 min read

नागपूर दि.३:- महाराष्ट्रात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर कारवाई करण्याची सुरुवात मालेगावातून झाली. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधूनही अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली आहे. एकाही बांगलादेशी व रोहिंग्यांना महाराष्ट्रात ठेवणार नाही, असे राज्याचे मत्सोद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे २ फेब्रुवारीला नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले.चंद्रपूर येथे आयोजित बैठक व कार्यक्रमासाठी जात असताना मंत्री राणे यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. नितेश राणे म्हणाले, राज्यात असलेली घुसखोरांची समस्या संपवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. आम्ही फक्त बोलत नाही, तर कृतीतून हे करून दाखवत आहोत. राज्यात आमचे सरकार आल्यापासून कारवाया सुरू झाल्या आहेत. या समस्यांच्या मुळापर्यंत आम्ही पोहोचत आहोत. आमचे नेते किरीट सोमय्या व इतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते यावर कार्य करत आहेत. फक्त अटक दाखवणे आमचा उद्देश नाही, तर मुळापर्यंत पोहोचायचे आहे. येथे खोटी कागदपत्रे बनवण्यात त्यांना कोण मदत करतो, कोण त्यांचे ‘गॉडफादर’ आहेत, याच्या मुळापर्यंत पोहोचून एकाही बांगलादेशी व रोहिंग्यांना महाराष्ट्रात ठेवणार नाही. अशा लोकांनी आपला ‘बोरिया बिस्तर’ बांधायला सुरुवात करावी. आमच्यातले प्रशासनातील काही बिर्याणी आवडणारे कलाकार आहेत. त्यांच्यापर्यंतही आम्ही पोहोचणार आहोत. त्यांची काही नावे आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत, असे राणे यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे