उध्दव ठाकरे-चंद्रकांत पाटील यांची लग्नसमारंभात भेट; भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

1 min read

मुंबई दि.३१:- भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केला. तसेच त्यांच्यात काहीवेळ संवादही साधला. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भाजप नेते पराग अळवणी यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्यासोबत विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि माजी खासदार विनायक राऊत सोबत होते. यावेळी ठाकरे हे काहीसे पाठीमागे होते. त्याचवेळी भाजप नेते चंद्रकात पाटीलही या सोहळ्याला दाखल झाले. यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी हसत हसत चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला, युती कधी होणार? चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं, मीही त्या सुवर्णक्षणाची वाट पाहत आहे. त्यावर दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं.

दरम्यान, आता पुढच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भातील सुनावणी आता 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्या सुनावणीनंतर निवडणुका जाहीर होणं अपेक्षित आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सर्वच प्रमुख पक्षांनी आघाडी करुन लढवल्या असल्या. तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि उद्दव ठाकरे यांची भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. तर लग्नसमारंभात झालेल्या त्या भेटीवर आणि त्या संवादाचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. लग्नसमारंभात युतीचे विषय होत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे