नाशिकमधील टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या चालकाचा गळा दाबून खून; आळेखिंडीत आढळला मृतदेह

1 min read

आळेफाटा दि.३०:- नाशिक येथील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या चालकाचा गळा दाबून खून केलेल्या अवस्थेतील मृतदेह पुणे-नाशिक महामार्गावर जुन्नर हद्दीतील संतवाडी-आळेखिंडी येथील जंगलात मंगळवारी (दि. २८) दुपारी आढळून आला. याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.

राजेश बाबूराव गायकवाड (वय ५६, रा. निधी अपार्टमेंट, जेल रोड, नाशिक) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी याबाबत माहिती दिली. संतवाडी-आळेखिंड परिसरातील जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मंगळवारी दुपारी आळेफाटा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. मृत व्यक्तीचे हात पाठीमागील बाजूने नायलॉन दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर अधिक तपास केला असता मृत व्यक्ती ही राजेश गायकवाड असून, ते टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये कारचालक असल्याची माहिती समोर आली.गायकवाड हे दररोज नाशिक ते पुणे अशी प्रवासी वाहतूक करत होते. सोमवारी (दि. २७) सकाळी ते नाशिकहून कारने (एमएच १५ जेडी ५१९३) प्रवासी घेऊन पुणे येथे आले. त्यानंतर दुपारपर्यंत पुन्हा नाशिक येथे जाण्यास निघाले. मात्र, प्रवासी न मिळाल्याने सायंकाळनंतर चाकण येथून काही पार्सल घेऊन ते निघाले. मात्र, मंगळवारी संतवाडी-आळेखिंडी शिवारातील जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. गायकवाड यांचे हात पाठीमागील बाजूने दोरीने बांधलेल्या अवस्थेत होते तसेच त्यांची कारही मारेकऱ्यांनी पळवून नेली.आळे प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेल्या शवविच्छेदनातील प्राथमिक अहवालात गळा दाबून गायकवाड यांचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गायकवाड यांचा मुलगा अंकुश गायकवाड याने फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.ठाणे जिल्ह्याच्या कसारा घाट जंगल परिसरात मंगळवारी (दि. २८) सकाळी तेथील ग्रामस्थांना एक बेवारस कार दिसून आली. त्यांनी कसारा पोलिसांना याबाबत माहिती दिली. कसारा पोलिसांनी तपास करत याबाबत आळेफाटा पोलिसांना कळविले. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, पोलिस हवालदार विनोदगायकवाड, अमित माळुंजे यांच्यासह पुणे गुन्हे अन्वेषण पथक घटनास्थळी गेले. पाहणी केली असता खून झालेले राजेश गायकवाड हे चालवित अस-लेलीच ती कार असल्याचे निष्पन्न झाले. कार ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे