भारताचा इंग्लंडवर रोमांचक विजय; एकटा तिलक वर्मा इंग्लंडला शेवटपर्यंत भिडला

1 min read

चेन्नई दि.२६:- भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडला. भारताला हा सामना जिंकण्यासाठी १६६ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाची फलंदाजी लाईनअप पाहता हे आव्हान इतकं मोठं नव्हतं. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आणि भारतीय संघाकडून एकटा तिलक वर्मा शेवटपर्यंत उभा राहिला. तिलक वर्माने भारताला २ गडी राखून विजय मिळवून दिला. तिलक वर्माने एकाकी झुंज देत नाबाद अर्धशतक झळकावले व भारताला विजय मिळवून दिला.भारतीय संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी ६ धावा करायच्या होत्या. नॉन स्ट्राइकला रवी बिष्णोई फलंदाजी करत होता. त्यामूळे तिलकने त्याला स्ट्राइक देणं टाळलं. पहिल्याच चेंडूवर तिलकने धावत २ धावा पूर्ण केल्या आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. या सामन्यातही इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर एकटाच खेळला. त्याने ३० चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली.या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले. तर कार्सने ३१ धावा केल्या. जे स्मिथने २२ आणि लियाम लिविंगस्टनने १३ धावांची खेळी करत २० षटकअखेर ९ गडी बाद १६५ धावा केल्या. यासह भारतीय संघासमोर विजयासाठी १६६ धावांचे आव्हान ठेवले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे