शरद पवारांची तब्येत बिघडली; पुढील चार दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम, दौरे रद्द
1 min read
मुंबई दि.२६:- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. शरद पवार यांना बोलताना त्रास होत असल्यामुळे त्यांनी आपले पुढचे चार दिवसांचे सर्व दौरे व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार सध्या पुण्यात आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिली आहे.शरद पवारांना कफ झाल्याने बोलताना त्रास होत आहे. यामुळे त्यांना कार्यक्रमांमध्ये भाषण करण्यास त्रास होत आहे. या कारणाने त्यांचे पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे, शरद पवार गटाकडून सांगण्यात येत आहे.
शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. तेथील कार्यक्रम, सभांमध्ये बोलताना त्यांना त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आपल्या दौऱ्यांमुळे सक्रिय असलेले शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने चाहत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
प्रकृती अस्वस्थ असूनही शरद पवार यांनी आपल्या लढाऊ बाण्याचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राला दिला आहे. विधानसभेतील अपयशानंतरही त्यांनी राज्यभर दौरे करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांचे दौरे पक्षासाठी नवी ऊर्जा देणारे ठरत आहेत. मात्र, प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पुढील काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे.