बालकुमार साहित्य संमेलनाचा समारोप
1 min read
चाळकवाडी दि.२५:- महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुबंई पुरस्कृत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे आणि शिवांजली साहित्यपीठ, शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान, चाळकवाडी (ता. जुन्नर) आयोजित दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचा (दि. 24) सायंकाळी समारोप झाला. संमेलनाचे अध्यक्ष सूर्यकांत सराफ, शरद लेंडे, माधव राजगुरू, अनिल कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी, अंकुश सोनवणे, बाळासाहेब कानडे शिवाजीराव चाळक मंचावर होते. संमेलनासाठी सहकार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संयोजक शिवाजी चाळक यांचा या संमेलनात विशेष सन्मान करण्यात आला.
संमेलन घेण्यासाठी चाळकवाडीला यजमानपद दिल्याबद्दल शरद लेंडे यांनी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे आभार मानले.माधव राजगुरू यांनी विद्यार्थ्यांकडून ‘मी रोज एक पान तरी वाचेन’, ‘मी रोज एकतरी कविता वाचेन’, ‘मी घरात किंवा घराबाहेर मराठीतच बोलेन’, ‘मी रोज दहा ओळी मराठीत लिहिन’, ‘मी नेहमी मराठीतच स्वाक्षरी करेन’ असे वदवून घेतले.
संमेलनाध्यक्ष सूर्यकांत सराफ विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, सध्याचे युग संवादाचे आहे. त्यामुळे तुम्हा मुलांना चांगले आणि प्रभावीपणे बोलता आले पाहिजे. नाटिका, नाट्यछटा, गोष्टी सांगण्याचे शास्त्र आहे ते समजून घ्या.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी यापुढेही सहकार्य करण्याची ग्वाही सराफ यांनी संमेलन आयोजकांना दिली. संमेलनाचे संयोजक शिवाजी चाळक यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप वाघोले यांनी केले.