दाभोळ-मुंबई एस टी बस खोल धरणात कोसळताना वाचली; ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास
1 min read
दापोली दि.१४:- दापोली येथून सुटलेली दाभोळ ते मुंबई या बसला मंडणगडजवळ शेनाळे घाटामध्ये चिंचाळी धरण ठिकाणी रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला आहे. सुदैवाने यातील ४१ प्रवासी सुखरूप बचावले आहेत. झाडावर ही बस आदळल्याने हा भीषण अपघात टळला आहे. मात्र यावेळी आपत्कालीन संपर्क यंत्रणांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. बस उलटलेली पाहून या रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी व अन्य काही मंडणगड येथील नागरिकांनी तात्काळ मदत केल्याने प्रवासी सुखरूप बचावले आहेत. यावेळी गाडीमध्ये ४१ प्रवासी प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
दापोली आगाराची गाडी (क्र. एम.एच.१४ बि.टी. २२६५) दापोलीहून मुंबईकडे जात होती. गाडीचे चालक व्हि.एस. गावडे हे गाडी घेवुन मंडणगड मधून मुंबईकडे रवाना झाले असता शेनाळे घाटात चिंचाळी धरणा जवळ गाडी रस्ता सोडून सूमारे १५ फुट बाजुला पलटी झाली. यावेळी समोर असलेल्या झाडाला एस.टी अडकल्याने गाडीतील सुमारे ४१ प्रवाशांचे प्राण वाचले.
गाडी झाडाला अडकली नसती तर ती खोल दरीतील धरणामध्ये थेट कोसळली असती.अपघातामध्ये दापोली तालुक्यातील सर्व प्रवासी होते. त्यांना सुखरुप गाडी बाहेर काढून जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघात घडताच आसपासच्या परिसरातील लोकांनी तसेच गाडीतील काही तरुणांनी गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी प्रवाशांना मंडणगड ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.