कुठेही जाऊ नका, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका; चंद्रकांत खैरेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद; दंडवतही घातला

1 min read

छत्रपती संभाजीनगर दि.१२:-ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथे मोठे धक्के बसत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे गटाला सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका, असं म्हणत हात जोडून विनंती करत व्यासपीठावरच कार्यकर्त्यांना दंडवत घातला.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी मेळावे आणि बैठका घेण्यात येत आहे. तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना ठाकरे गटाचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी झालेल्या सभेत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आणि पक्ष न सोडण्याचे आवाहन केले. इतकेच नव्हे तर भर मंचावर चंद्रकांत खैरे हे कार्यकर्त्यांसमोर नतमस्तक झाल्याचे म्हटले जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हेही यावेळी या मेळाव्याला उपस्थित होते.ते यावेळी बोलताना म्हणाले कि, कुठेही जाऊ नका. उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका. मी हात जोडून विनंती करतो. तुम्हाला इथे दंडवत घालतो. उद्धव ठाकरेंकडे आपल्याला पाहायचे आहे. परवाच्या कार्यक्रमात ते किती कळकळून बोलले. तुम्हाला विनंती करतो, कुठेही सोडून जाऊ नका. एकत्र मिळून काम करू. माझे काही चुकले तर मला बोललात तरी हरकत नाही. माझी विनंती अशी आहे की थांबा. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपण महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून येऊ, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे