भारतात अखेर ‘एचएमपीव्ही’ विषाणूचा शिरकाव? बंगळूरूत आठ महिन्यांच्या बाळाला लागण
1 min read
बंगळुरु दि.६:- कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातल्यानंतर आता एचएमपीव्ही व्हायरसचा चीनमध्ये मोठ्या वेगाने प्रसार होत आहे. चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असतानाच आता या विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण भारतात आढळून आला आहे. एका आठ महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.तेथील प्रयोगशाळेने याची पुष्टी केली आहे मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.मुलाला सातत्याने ताप होत असल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नियमित रक्त तपासणी दरम्यान या विषाणूची पुष्टी झाली. कर्नाटकमधील आरोग्य विभागाने या विषाणूचे प्रकार कळवलेले नाहीत, मात्र विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी नमुने पुणे पाठवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या 8 महिन्याच्या मुलाचा चीनमधील प्रवासाचा कोणताही इतिहास नाही.
भारतात आढळलेला एचएमपीवी विषाणू वेगळा आहे. चीनमधील विषाणू आणि इथे आढळलेल्या विषाणूचे स्ट्रेन संबंधित आहेत का, याबाबतही अद्याप कोणतीही माहिती नाही.त्यामुळे हे नमुने पुण्यातील लॅबमध्ये पाठवले जाणार आहेत.भारत सरकारही या व्हायरसबाबत सतर्क झाले आहे.
सरकारने HMPV बाबत एक सल्लाही जारी केलाय. सरकारने श्वासोच्छवासाची लक्षणे आणि इन्फ्लूएंझा प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने सांगितले की, HMPV प्रकरणांची चाचणी करणाऱ्या लॅबची संख्या वाढवली जाईल.
भारत सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलला देखरेख ठेवण्यास सांगितले आहे. याशिवाय भारताने जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) नवीनतम अपडेट्स शेअर करण्यास सांगितले आहे. या विषाणूच्या काही सामान्य लक्षणांमध्ये नाक गळणे,गळ्यात खवखव, डोकेदुखी, थकवा, खोकला, ताप आणि थंडी लागणे यांचा समावेश होतो.