कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायांची गर्दी

1 min read

पुणे दि.२:- पुण्यातील कोरेगाव भीमा येथे आज २०७ वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायांनी गर्दी केली आहे. त्यासोबतच या ऐतिहासिक विजय स्तंभाला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे २०७ व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातून तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल झाले. काल रात्रीपासून मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.आज जवळपास ७ ते ८ लाख नागरिक या ठिकाणी येण्याची शक्यता असल्याने जवळपास १० ते १२ हजार पोलिसांच्या बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे नगर मार्गावरील वाहतूक देखील वळवण्यात आली आहे. येथे येणाऱ्यांसाठी प्रशासनातर्फे ‘विजयस्तंभ सुविधा’ हे अँप विकसित करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार सुनेत्रा पवार, क्रिडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, समाजकल्याण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार ज्ञानेश्वर कटके, बापुसाहेब पठारे, संजय बनसोडे, नितीन राऊत, राजकुमार बडोले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लीकन पिपल पार्टिचे जोगेंद्र कवाडे, बामसेफचे वामन मेश्राम, भीमराज आंबेडकर, भीम आमीर्चे संस्थापक चंद्रशेखर आझाद, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार प्रकाश गजभिये यांसह अनेक मान्यवरांनी विजयस्तंभाला अभिवादन केले.207 वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा इथे लढाई झाली होती. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 1818 ला इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झालेले युद्ध प्रसिद्ध आहे. या युद्धात महार रेजिमेंटमधील सैनिकांनी पेशव्यांविरोधात लढाईत दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळं इंग्रजांना विजय मिळवता आला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी कोरेगाव भीमामध्ये जयस्तंभ उभारला. तेव्हापासून या जयस्तंभाजवळ शौर्य दिन साजरा केला जातो आहे. 1 जानेवारी 1927 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भीमा कोरेगावचा संघर्ष प्रत्यक्षात संपला आहे तरी मानसिकरित्या अजून तो चालू आहे. मानसिक संघर्ष या देशात जो पर्यंत चालत राहिल तो पर्यंत मानवतेची प्रतीके आहेत तिथे अभिवादन करण्यासाठी लोक येत राहतील मानवतेच्या बाबतीत आपली प्रतिबद्धता ते दाखवत राहतील असे मी मानतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे