व्यवसायाच्या स्पर्धेतुन लोखंडी रॉडने मारून किशोर तांबे यांची हत्या; आळेफाटा पोलिसांनी दोघांना केली अटक

1 min read

बेल्हे दि.७ :- बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक किशोर तांबे (रा.तांबेवाडी ता.जुन्नर) यांची हत्या व्यवसायाच्या स्पर्धेतुन व बदनामी केली म्हणून लोखंडी रॉड ने मारून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकल्याचा प्रकार उघड झाला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.आळेफाटा पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, तांबेवाडी (ता. जुन्नर) येथील किशोर तांबे हे बुधवार (दि.५) पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे चुलत भाऊ संतोष तांबे (वय 42 रा. तांबेवाडी, ता. जुन्नर) यांनी दिली होती.

सदर तक्रारीवरून आळेफाटा पोलिसांनी चक्रे फिरवत डॉग पथकाच्या साह्याने शोध घेत कॅनॉल असलेल्या विहिरीमध्ये मृतदेह असल्याचं निष्पन्न झाले.या संदर्भात पांडुरंग जिजाबा तांबे (वय 39 राहणार तांबेवाडी, तालुका जुन्नर) व महेश गोरकनाथ कसाळ (वय 30, राहणार आळेफाटा, तालुका जुन्नर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी बुधवार (दि.५) रोजी किशोर तांबे यांना शेतात दारू प्यायला ये असे सांगून दारू पिण्याच्या बहाण्याने त्याला शेतात बोलावून घेतले. शेतात गेल्यानंतर आरोपी व किशोर तांबे यांच्यात झटापट झाली. किशोर तांबे यांना आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण केली. या झटपटीत त्यांचा मृत्यू झाला.

पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्यांचा मृतदेह एका पोत्यात भरून विहिरीत मध्ये टाकून दिला. मृतदेह वर तरंगू नाही म्हणून पोत्यात दगडी भरली.व पाण्यात मृतदेह फेकून दिला. हा खून मुरूम व्यवसायात असलेल्या स्पर्धेमुळे तसेच आमची बदनामी करतो याचा मनात राग धरून आरोपींची केला असल्याचे निष्पन्न झाले असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. किशोर तांबे हे मनमीळाऊ होते व सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या जाण्याने जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून तांबेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. या कटात या दोघां व्यतिरिक्त कोणी सहभागी आहे का याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.तक्रार दाखल झाल्यानंतर जुन्नर डीवायएसपी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील बडगुजर तसेच आळेफाटा पोलीसांचा रात्रंदिवस तपास सुरू ठेवला होता. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे