LIC चा 2 कोटींचा विमा मिळण्यासाठी जिवंत व्यक्ती दाखवली मृत; चौघांना अटक
1 min read
नगर दि.२३:- नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून LIC चे पैसे लुटण्यासाठी जिवंत माणूस मृत दाखवून 2 कोटी रुपये बोगस विमा लाटल्याचा प्रकार समोर आला आहे.
या बद्दल सविस्तर माहिती अशी की, केडगाव येथील मुख्य आरोपी दिनेश टाकसाळे याने एप्रिल-2015 मध्ये LIC च्या दादर (मुंबई) शाखेकडून 2 कोटींचा विमा घेतला होता. नंतर त्याने दोन वर्षे विम्याचे वार्षिक हप्ते भरले. दरम्यान, नगर-पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदे) शिवारात 25 डिसेंबर 2016 रोजी झालेल्या चारचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तो मृतदेह दिनेश टाकसाळे (रा. केडगाव) याचा असल्याचा दावा करण्यात आला. त्यासाठी श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे याने बनावट मृत्यू दाखला देण्यासाठी सहकार्य केल्याचा आरोप आहे. दिनेशचा अपघाती मृत्यू झाल्याची कागदपत्रे सादर करत, 14 मार्च 2017 रोजी दिनेशच्या आई-वडिलांनी दोन कोटींच्या विमा रकमेवर दावा केला. हा दावा LIC कडून मंजूरही करण्यात आला, परंतु या प्रकरणाची शंका आल्याने एलआयसीने चौकशी सुरू केली.
तब्बल सहा वर्षे चौकशी केल्यानंतर दिनेश टाकसाळे जिवंत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दोन कोटींचा बोगस विमा लाटल्याप्रकरणी LIC च्या दादर शाखेचे सहायक प्रशासकीय अधिकारी ओमप्रकाश साहू यांनी शिवाजी पार्क (मुंबई) पोलिस ठाण्यात 21 फेब्रुवारी 2023 रोजी फिर्याद दिली.
मुंबई पोलिसांनी नुकतीच श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे (मूळ रा. करमाळा, जि. सोलापूर) यांना अटक केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी यापूर्वी मुख्य आरोपी दिनेश प्रमोद टाकसाळे, त्याचे सहकारी अनिल भीमराव लटके, विजय रामदास माळवदे (सर्व रा. केडगाव) यांना अटक केली.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सुरुवातीला दिनेश टाकसाळे, अनिल लटके, विजय माळवदे यांना अटक केली. त्यानंतर बोगस मृत्यू दाखला देण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलिसांनी तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल केवारे यास अटक केली. डॉ. केवारे हा सातत्याने आरोपी अनिल लटके याच्या संपर्कात असल्याचे कॉल रेकॉर्डवरुन स्पष्ट झाले आहे.