पुण्यातील शिरगावच्या सरपंचांवर धारदार शस्त्रांनी हल्ला, सरपंचाचा जागीच मृत्यू, जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय
1 min readपुणे दि.२:- पुण्यातील शिरगावच्या (ता.मावळ)सरपंचांवर धारधार शस्त्रांनी हल्ला झाला असून या हल्ल्यात सरपंचाचा मृत्यू झाला आहे. प्रवीण गोपाळे असं या मृत सरपंचाचं नाव आहे. या हल्ल्यानंतर गोपाळे हे मृतावस्थेत पडले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराअंतीच सरपंचाचा मृत्यू झाला. या हल्ल्याचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे. मात्र जमिनीच्या वादावरुन ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या हल्लेखोरांचा तपास पोलीस करत आहेत.
ही धक्कादायक घटना प्रति शिर्डी मंदिरासमोरच घडली. जमिनीच्या प्लॉटिंगमधून ही हत्या झाल्याचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे. दरम्यान प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते.
असा झाला खून! 25 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं!
सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोपाळे हे साई बाबांच्या मंदिरासमोरील मार्गावर दुचाकीला खेटून एकाशी बोलत उभे असल्याचं दिसतंय. त्याचवेळी 9 वाजून 6 मिनिटांनी एका दुचाकीवरून दोघेजण आले अन यूटर्न घेऊन निघून गेले. मग 9 वाजून 8 मिनिटांनी तिघे आले अन् ते तसेच पुढं गेले. तर पुढच्या एक ते दीड मिनिटांनी ते तिघे पुन्हा दुचाकीवरूनच आले, यावेळी मात्र त्यांनी थेट गोपाळे यांच्यावर कोयत्यानं हल्ला चढवला. पहिलाच प्रहार गोपाळेंच्या डोक्यावर केला. अचानक झालेल्या हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी गोपाळे सैरावैरा धावू लागले. मात्र दहा फुटांवरच या हल्लेखोरांनी त्यांना पुन्हा घेरलं अन् तिथं ही कोयत्यानं त्यांच्यावर सपासप वार केले. पंचवीस सेकंदापूर्वी गोपाळे यांना त्यांच्याबाबत असं काही घडेल याची कल्पना ही नसावी. पण पुढच्या पंचवीस सेकंदात ते भर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर गोपाळे यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. जमिनीच्या प्लॉटिंगवरून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. मात्र हल्लेखोरांना बेड्या ठोकल्याशिवाय मूळ कारण समोर येणार नाही. सध्या पिंपरी चिंचवड पोलीस याप्रकरणाचा शोध घेत आहेत.