आणे येथे चार दिवसांत दोन बिबटे जेरबंद
1 min read
आणे दि.१५:- श्री क्षेत्र आणे येथे चिढण- खबाडी शिवारात आनंदवाडी रस्त्यालगत प्रकाश आहेर यांच्या शेतात रविवारी पहाटे दि.१५ रोजी सुमारे चार वर्षे वयाचा नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. गेल्या चार दिवसात या ठिकाणी दोन बिबटे जेरबंद झाले आहेत.
या आधी बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी पहाटे याच ठिकाणी मादी बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. तसेच गेली सहा महिने पिल्लासह मादी बिबट्याची याच भागात दहशत असल्याची माहिती तुषार आहेर यांनी दिली.
वनविभागाने तत्परतेने कारवाई करत सलग चार दिवसांत प्रत्येकी एक नर व मादी बिबट्या पकडून माणिकडोह बिबट निवारा केंद्रात नेल्याबद्दल शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
परंतु येथे वास्तव्यास असलेल्या मादीसह पिल्लास जेरबंद करण्यासाठी पुन्हा पिंजरा लावला जावा अशी मागणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी केली.
वनाधिकारी गाढवे यांच्याशी मोबाईल द्वारे झालेल्या संभाषणात त्यांनी याच ठिकाणी पुन्हा पिंजरा लावला जाईल असे आश्वासन दिले. पकडलेला बिबट माणिकडोह येथे हलविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना माजी सरपंच योगेश आहेर, स्वप्निल आहेर, साहिल थोरात, संतोष आंद्रे, चैतन्य आहेर, रोहित आहेर, ऋषिकेश आहेर, अभिजित आहेर, जितेंद्र आहेर, भाऊ देशमुख यांनी सहकार्य केले.