“सहभागी व्हा जागरूकता वाढवा” समर्थ नर्सिंग इन्स्टिट्यूट मार्फत संदेश

1 min read

बेल्हे दि.३:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, बेल्हे (बांगरवाडी) यांच्या वतीने समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये नुकताच जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्येच आपल्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हृदया संदर्भात असलेल्या अनेकविध विकारांची माहिती तसेच इलाजापेक्षा प्रतिबंध बरा त्यामुळे हृदयविकार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन डॉ. रमेश पाडेकर यांनी केले.आपण काय खातो आणि पितो, किती व्यायाम करतो आणि तणावाचे व्यवस्थापन कसे करतो. यावर आपल्या हृदयाचे आरोग्य अवलंबून आहे. हृदयविकारासंबंधीत जनजागृती करण्याचा दिवस म्हणून २९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये साजरा करतात.या दिवसाला जागतिक हृदय दिवस असे संबोधतात.या उपक्रमामध्ये हृदयविकारासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि या विकाराचा जागतिक पातळीवर होणारा परिणाम यांचा समावेश होतो.जागतिक हृदय संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवसाला मान्यता मिळालेली आहे. जागतिक आकडेवारीनुसार हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे.अधिक तर व्यक्ती हृदयविकाराचा झटका आल्याने मरण पावतात.असंतुलित आहार, व्यायामाची कमतरता, धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हवा प्रदूषण ही हृदयविकाराची महत्त्वाची कारणे असल्याचे यावेळी डॉ.राजेंद्र निचित म्हणाले.संतुलित वजन, निरोगी हृदयासाठी आवश्यक जीवनशैली तसेच व्यवसायाच्या ठिकाणी हृदय निरोगी राखण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर यावेळी लक्ष केंद्रित करण्यात आले.यावेळी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.सदर कार्यक्रमात रॅली,पथनाट्य व गिते सादर करून हृदयविकारासंदर्भात जनजागृती करण्यात आली.सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत तसेच समर्थ पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले,समर्थ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील कवडे,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या प्रा.लविना कदम,आईशा शेख,हर्षदा गोफणे,समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल चे डॉ.रमेश पाडेकर,डॉ.राजेंद्र निचित,यशवंत फापाळे,लॉ कॉलेजचे उपप्रचार्य प्रा.शिवाजी कुमकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे