बोरी खुर्द मध्ये आढळली बिबट्याची पिल्ले
1 min read
बेल्हे दि.३१:- बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथे ऊस तोडणी चालु असताना बिबट्याची तिन पिल्ले ऊसतोड मजुरांना अढळून आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बोरी खुर्द येथील सिताराम यशवंत शेटे या शेतक-याच्या ऊसाची तोडणी चालु असताना रविवार दि. ३१ सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ऊस तोडणी कामगारांना बिबट्याची तीन पिल्ले आढळुन आल्यानंतर त्यांनी ही माहीती शेतमालकाला सांगीतली.
त्यानंतर शेटे यांनी वन अधिका-यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी वन अधिकारी भानुदास शिंदे, महेश जगधने, रवि काळे, बबन वामन, रूषी गायकवाड, अनिल चिकने यांनी भेट दिली. सापडलेली पिल्ले ही काही महिण्यांचीच असल्याने या पिल्लांना माणिक डोह येथील बिबट निवारण केंद्रात नेले आहे व सायंकाळी परत या शेतात आणुन सोडणार असल्याचे वन अधिका-यांनी सांगीतले.
दरम्यान बोरी खुर्द येथील शेटे यांच्या शेतात सापडलेली बिबटयाची पिल्ले अतीशय लहान असुन या पिल्लांची मादी याच शेतात असल्याने या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी गावच्या सरपंच कल्पना काळू व उपसरपंच महेश काळे यांनी केली आहे. तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी ,आळे , बोरी बुद्रुक, बोरी खुर्द,जाधववाडी, कोळवाडी,वडगाव आंनद ही गावे बिबटया पवन क्षेत्रात मोडत असुन या परीसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे.
सध्या ऊसाची तोडणी संपत आलेली असल्याने या भागात असलेल्या बिबटयांणा लपन न राहिल्याने तसेच त्यांना त्यांचे खाद्य मिळत नसल्याने ते मानवी वस्तीमध्ये येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला करू लागले आहे. या बिबटयांणा पकडण्यासाठी वनविभागाने पिंज-यांची संख्या वाढवावी अशी मागणी शेतक-यांकडुन होत आहे.