कुकडी नदीवरील रेनवडी कोल्हापूर बंधाऱ्याची दुरुस्ती पूर्ण; पांडुरंग पवार यांच्या प्रयत्नांना यश
1 min read
बेल्हे दि.१९:- पिंपरी कावळ (ता.जुन्नर) येथील कुकडी नदीवरील रेनवडी कोल्हापूर बंधाऱ्याचे रेलिंग तुटून अपघात ग्रस्त झाला होता. मोठी दुर्घटना या पुलावर होण्याची शक्यता होती. त्यामुळे या बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत गुणाले, कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, पुणे परिमंडळ अधिकारी वैशाली नारकर यांच्याकडे निवेदनाद्वारे १२ सप्टेंबर २०२४ रोजी केली होती.
त्यानंतर पवार यांनी सतत पाठपुरावा केला व २०२४ -२५ या वर्षांमध्ये त्यांच्या मागणीला यश मिळाले असून रेनवडी या बंधाऱ्यासह अन्य तीन बंधारे दुरुस्तीसाठी ३४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नुकतेच या पुलाच्या दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले आहे.

जुन्नर व पारनेर तालुक्यातील रेनवडी व पिंपरी कावळ दरम्यान कुकडी नदीवर सन १९९५ चे दरम्यान कोल्हापुर पदधतीचा हा बंधारा बांधण्यात आला होता. या कोल्हापूर बंधाऱ्यामुळे पिंपरी कावळ, पारगांव तर्फे आळे, मंगरुळ, रेनवडी आदि गावातील शेतक-यांना सिंचनाचा लाभ होत आहे.

शिवाय या बंधारावरुन येणे जाणे साठी रस्ता असुन त्यामुळे पुणे व अहिल्यानगर येथील ग्रामस्थांची चांगली सोय झालेली आहे. तथापि अनेक वर्षापुर्वी बंधारा झाल्यामुळे दोन्ही काठचा भरावा काही प्रमाणात वाहुन गेला होता. तसेच पुलावरील रेलिंग सुदधा तुटले होते. या फुलाला रेलिंग बसवली असून काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
या पुलाचा धोका संपला असून परिसरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना चांगली सोय झाली असल्याने पांडुरंग पवार यांचे परिसरातील नागरिकांनी आभार मानले.

