आणे पठारावर भीषण पाणी टंचाई; सभापती उपसभापतीची गावाला भेट
1 min read
आणे दि.७:-भीषण पाणीटंचाईचा सामना आणे पठारावरील नागरिकांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गावांचा दौरा करत तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून लवकरच अतिरिक्त टँकर सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.
पंचायत समितीच्या सभापती कमल शेळकंदे व उपसभापती अमित ढोले यांनी जुन्नर तालुक्यातील आणे, नळवणे, पेंमदरा यांसह विविध गावांना भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी पाण्याच्या तीव्र टंचाईबाबत आपल्या अडचणी मांडल्या.
आणे गावाच्या सरपंच प्रियंका दाते यांनी दिलेल्या माहिती नुसार, गावाला दररोज सुमारे १ लाख ६० हजार लिटर पाण्याची गरज आहे. मात्र सध्या टँकर व इतर माध्यमांतून केवळ ६० हजार लिटर पाणीच उपलब्ध होत आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाली असून वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
शासकीय टँकरला डिझेलच्या तांत्रिक अडचणींमुळे वेळेवर फेऱ्या होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. यावर सभापती कमल शेळकंदे यांनी “जनतेला तहानलेले ठेवता येणार नाही. लवकरच अतिरिक्त खासगी टँकर सुरू करून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे आश्वासन दिले.
दरम्यान, केवळ पिण्याच्या पाण्याचाच नव्हे तर जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. नळावणे, गुळंचवाडी आणि गुंजाळवाडी परिसरात जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान ठरत आहे. “कोणताही भाग पाण्यावाचून वंचित राहणार नाही. जनावरांसाठीही स्वतंत्र नियोजन केले जाईल,” अशी ग्वाही उपसभापती अमित ढोले यांनी दिली.
——–
चौकट
जनावरांचे दर १५ ते २० टक्याने घसरले, जनावरे विकण्याची वेळ…
चाऱ्या अभावी दूध देणाऱ्या गायी म्हशींना बाजारात नेऊन विकण्याची वेळ आली आहे. जनावरांचे भाव १५ ते २० टक्क्यांनी उतरले आहेत. विकत चारा घेऊन जनावरांना पोसणे शेतकऱ्यांना कठीण झालं असल्याने शेतकरी जनावरे कवडीमोल भावात विकत आहेत.]
चौकट
[ कुकुटपालन व्यवसाय बंद
आणे पठार भागात १०० पेक्षा जास्त पोल्ट्री फार्म आहेत. पाण्याअभावी ८० टक्के पोल्ट्री बंद पडल्या आहेत. दुष्काळी परिसथितीमुळे अनेक व्यवसाय बंद करावे लागत आहेत.]
——–
