रानमळ्यात वृद्ध महिलेला मारहाण करून दागिने लुटले

1 min read

बेल्हे दि.१७:- रानमळा (ता.जुन्नर) येथे अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी दि.१६ पहाटे धुमाकूळ घातला. ८५ वर्षीय वृद्ध महिलेस मारहाण करत अंदाजे ५ हजार रुपये रोख व एक तोळा सोन्याचे दागिने लुटून असल्याची प्राथमिक माहिती नातेवाईकांनी दिली. या वेळी प्रतिकार करताना या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जिजाबाई गबाजी गुंजाळ (वय ८५) असे जखमी वृध्द महिलेचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की रानमळा भागात गुरुवारी पहाटे तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. यानंतर ते घरात एकटाच राहत असलेल्या जिजाबाई गुंजाळ यांच्या घराकडे आले. त्यावेळेस त्या शौचालयात बाहेर गेल्या होत्या. चोरट्याने त्यांना लोखंडी गजाने त्यांच्या डोक्यावर हातावर मारहाण करत जखमी करून त्यांच्या गळ्यातून दागिने काढून घेतले. घरात प्रवेश करत कपाट उचकटून त्यातील रोख रक्कम व चांदीचे दागिने लुटून चोरले. या घटनेनंतर तातडीने जिजाबाई गुंजाळ यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला तसेच हाताला जखमा झाल्या असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या गळ्यातील एक तोळे सोन्याचे दागिने कपाटातील पाच हजार रुपये व चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस निरीक्षक विश्वास जाधव घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला आहे.आळेफाटा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!