प्रांत अधिकारी गोविंद शिंदे २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक

1 min read

मंचर दि.२८:- आंबेगाव- जुन्नर उपविभागात मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला असून उपविभागीय अधिकारी गोविंद पंढरीनाथ शिंदे (वय ४६) यास २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.तक्रारदार हे नारायणगाव येथील बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या इमारतीच्या पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी त्यांनी उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधला होता. संबंधित काम मंजूर करून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने सुरुवातीला तब्बल ५ लाख रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. एसीबीकडून पडताळणी केल्यानंतर ही डील २ लाखांवर ठरल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदाराने २४ मार्च २०२६ रोजी एसीबी, पुणे येथे तक्रार नोंदवली. त्यानुसार २७ मार्च रोजी मंचर येथील उपविभागीय कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे शिंदे यांनी तक्रारदाराकडून २ लाखांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि प्रवीण निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आरोपी विरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांच्या मालमत्तेची सखोल चौकशीही केली जाणार आहे. दरम्यान, एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कामासाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास त्वरित तक्रार करावी.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!