दूध पिताय तर सावधान…भेसळयुक्त दुध पिऊन १६ जणांचा मृत्यू
1 min read
हैदराबाद दि.२३:- भेसळयुक्त दूध प्यायलाने तब्बल 16 लोकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात घडली आहे.
या जिल्ह्यातील लालाचेरुवु, चौदेस्वरनगर आणि स्वरूपनगर या भागात फेब्रुवारी महिन्यापासून भेसळयुक्त दूध विकले जात होते. त्या भागात फेब्रुवारीपासूनच लोक आजारी पडत होते. भेसळयुक्त दूध पिल्यामुळे त्यांना मळमळ, उलटी, पोटदुखी, लघवी बंद होणे, मूत्रपिंड निकामी होणे अशा प्रकारचा त्रास जाणवत होता.
सुरुवातीला 22 फेब्रुवारी रोजी अशा काही तक्रारी समोर आल्या. नंतर या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर त्याच भागात असलेल्या एका डेअरीमधून भेसळयुक्त दूध विकले जात असल्याचे समोर आले. या भेसळयुक्त दूधात एथिलीन गायकॉल नावाचा विषारी पदार्थ मिसळला जात होता.
याच भेसळीमुळे 20 पेक्षा जास्त लोक रुग्णालयात दाखल झाले होते. यात लहान मुलं, वृद्ध यांचाही समावेश होता. यातील 16 जणांचा मृत्यू जाला आहे. तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
