जुन्नर हदरले; लग्नाला का नकार दिल्याने तरुणीवर कोयत्याने हल्ला

1 min read

जुन्नर दि.१२:- जुन्नर तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहामधील 18 वर्षीय तरुणीवर एका तरुण मुलाने मला लग्नाला का नकार देतेस असे म्हणत लोखंडी कोयत्याने तिच्या शरीरावर ठिकठिकाणी वार करीत गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास या वसतिगृहालगत घडली.गौरी संजय सावळे (वय 18 रा आंबे ता जुन्नर) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर महेश मुरलीधर डामसे (वय 20 रा आंबे जुन्नर) असे तरुणाचे नाव असून घटनेनंतर तो पळून गेला आहे. बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास ही तरुणी वसतिगृहामधून कॉलेजला जाण्या करता बाहेर पडली ती रस्त्याने जात असताना. या वस्तीगृहालगत असलेल्या एका पत्राशेड जवळ महेश याने तिला अडवून लग्नाला नकार का देतेस असे म्हणून तिचा खून करण्याच्या उद्देशाने हातातील लोखंडी कोयत्याने तिच्या शरीरावर ठिकठिकाणी वार करून तिला गंभीर दुखापत केली. त्यानंतर तो तेथून पळून गेला. वसतिगृहातील लोकांनी तिला जुन्नर मधील यशवंतराव चव्हाण हॉस्पीटल मध्ये उपचाराकरिता दाखल केले. तिच्यावर गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू आहेत. या घटनेची खबर गौरी सावळे हिने स्वतः जुन्नर पोलिसांना दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम 109 ,126 ,351(2) ,351(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक किरण अवचर,सहायक पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ पुढील तपास करीत आहेत. दरम्यान शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह हे जुन्नर पासून लगत असले तरी सुनसान स्थळी असून आसपास वस्ती नाही. शाळा कॉलेज ला जा ये करण्याकरिता वसतीगृहामधील मुलींना ते लांब पडत असून गैरसोयीचे आहे. जुन्नर पोलिस स्थानिक गुन्हे शाखा पथक , फ्लोरेनसिक युनिट ने घटना स्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेतील फरारी महेश डामसे याचा शोध सुरू असून पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर वसतिगृहामधील मुलींमध्ये भीतीचे आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!