आबूधाबी युद्ध, जननी आणि जन्मभूमी:- संजय मालपाणी संगमनेर

1 min read

आबूधाबी दि.४:- आम्ही आबूधाबीला एका वैवाहिक कार्यक्रमासाठी आलो होतो आणि इराक-इस्त्राइल युद्धामुळे येथेच अडकून पडलो. अरब अमिरातीतली सर्व विमानतळे ठप्प झाली आणि सर्वच विमान उड्डाने रद्द झाली.आम्ही ज्या अमिरात पॅलेस मधे थांबलेलो होतो तेथील व्यवस्थापनाने आम्हाला कळवले की तुम्ही आमच्या देशाचे पाहुणे आहात. आमची विमानसेवा सुरळीत होत नाही तोपर्यंत तुम्हाला याच हॉटेलमध्ये ठेवावे असा सरकारी आदेश आम्हाला आलाय. या देशातील सर्वच हॉटेल्समध्ये देशात अडकलेल्या पाहुण्यांची निवास व भोजन व्यवस्था सरकारने केली आहे. तुम्ही निश्चिंतपणे येथे राहू शकता. युद्धात अडकलेले असतांना हा एक सुखद आश्चर्याचा धक्का होता.रात्री आम्हा सर्वांच्या मोबाईलमधे कर्कश आवाजात २-३ वेळा अलर्ट मेसेज सरकारकडून आला. रात्री बाहेर न पडण्याची व खिडक्यांचे परदे लावण्याची सूचना या मेसेजमधे होती.स्वाभाविकपणे आम्ही परद्याआडून आकाशा कडे परत परत पहात होतो. पण एकही क्षेपणास्त्र आम्हाला दिसले नाही. दिवसभरात लष्करी विमानांचा आवाजही आला नाही. नाही म्हणायला एक दोन नागरी विमान आकाशात दिसले. रस्त्यां वरील गाड्यांचे आवागमन मात्र नेहेमी सारखेच होते.दुस-या दिवशी नाश्ता करुन आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो व टॅक्सी बुक केली. क्षणात टॅक्सी हजर झाली. आम्ही आबुधाबीचा राजवाडा व इतर काही प्रसिद्ध ठिकाणे पाहून आलो. स्वामीनारायण मंदीर सोडले तर सर्व प्रेक्षणिय स्थळे उघडी होती. बाजार व मॉल्स पण उघडे होते.युद्धजन्य परीस्थितीचा मागमूसही नव्हता. सर्वत्र रमजानच्या सजावटीचा झगमगाट होता.भारतातून मात्र सारखे फोन येत होते. आम्ही सुरक्षित आहोत का याची विचारणा होत होती. कधी फोन न करणा-यांचे फोन व मेसेज पाहून मलाच माझी काळजी वाटू लागली. आपण फारच मोठ्या संकटात अडकलोय की काय हे पहायला मी रुम मधला टीव्ही चालू केला. भारतातील टीव्ही वाहिण्यावर या युद्धाचे इतके भयंकर कव्हरेज सुरु होते की जणू आपल्यावरच बॉंब पडताहेत असे वाटावे. मधेच ब्रेकिंग न्यूजचा भोंगा वाजवून जुन्याच बातम्या परत परत दाखवल्या जात होत्या. बाहेर शांतता होती पण टीव्हीवरचा हल्लकल्लोळ पहातांना आपल्यावरच फायटर जेटमधून गोळे पडताहेत असे वाटत होते. कारण नसतांना बीपी वाढत होता. टीव्ही बंद केला आणि मला युद्ध थांबल्यासारखे वाटू लागले.माझी वृद्ध आई मात्र प्रचंड काळजीत होती. तिची चिंता कमी व्हावी म्हणून मी तिला व्हिडिओ कॉल केला. आम्ही सर्व मजेत हॉटेलमधल्या चकचकित भांड्यात जेवण करतोय हे पाहून तिचाही जीव भांड्यात पडला. पण शेवटी आई ती आईच… घरी पोहोचणार नाही तोपर्यंत ती चिंता करत रहाणार… टीव्ही पहात रहाणार… टीव्हीवरचा बॉंब वर्षाव झेलत रहाणार !!इराण विरुद्ध अमेरिका व इस्त्राएलचे युद्ध भडकलेले आहे. इराणवर महाशक्ती अमेरिका प्रचंड आक्रमण करते आहे. प्रत्युत्तरादाखल सीमित युद्धसामग्री असतांना इराण विविध देशातील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहे. इराण कडून येणा-या या क्षेपणास्त्रांना आकाशातच निष्प्रभ करण्याचा प्रयत्न आखाती देश करत आहेत. या निष्प्रभ क्षेपणास्त्रांचे जळते अवशेष पडल्यामुळे काही इमारतींना आग लागली. या आगीचे दृश्य पुन्हा पुन्हा दाखवून वाहिण्या आपला टीआरपी वाढवत होत्या आणि देशातील परिजनांचे ब्लडप्रेशर विनाकारण वाढत होते.दोनच दिवसात विमान सेवेची सुरवात झाली.आम्हाला मुंबई ऐवजी हैद्राबादचे विमान घ्यावे लागले. खरं तर अजूनही २-३ दिवस अमराती सरकारचे पाहुणे म्हणून त्या आलीशान पॅलेस मधे सुरक्षित राहता आले असते. पण ‘अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते,जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसि’ या श्रीरामोक्तिची प्रचिती आली. माता आणि मातृभूमीची ओढ काय असते याचा अनुभव घेत मी मायदेशी परतत होतो.

– संजय मालपाणी, संगमनेर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!