मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार कंपनीला ५ कोटींचा दंड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कारवाईचे आदेश
1 min read
मुंबई दि.१५:- मुंबईतील मुलुंड भागामध्ये मेट्रोचं बांधकाम सुरू असताना पुलाचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. या प्रकरणी १ जणाचा मृत्यू झाला आहे. अखेरीस या प्रकरणी राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभियंत्याला निलंबित केलं आहे.
तर कंत्राटदार कंपनीला ५ कोटींचा दंड ठोठावला आहे. मुंबईतील मुलुंडमध्ये एलबीएस मार्गावर जॉन्सन गार्डनच्या पुढे असलेल्या बसस्टॉपजवळ मेट्रो ४ चं काम सुरू आहे. पुलाच्या बाजूने स्लॅब लावण्यात आले आहे. पण, अचानक दुपारच्या सुमारास एक भलामोठा स्लॅब कोसळला.
हा स्लॅब एक रिक्षा आणि कारवर कोसळला. या अपघातात रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची अखेरीस आता राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
तर अपघाताला जबाबदार ठेकेदार कंपनीला ५ कोटींचा दंड ठोठवण्यात आला आहे.या घटनेत मुंबई फिरण्यासाठी आलेले उत्तर प्रदेशातील रामधन यादव यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. रामधन यादव हे उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील एका गावाचे सरपंच म्हणून काम पाहत होते. ते मित्रासोबत मुंबई फिरण्यासाठी आले होते.
कळव्यात एका लग्नासाठी रामधन यादव आणि महेंद्र यादव रिक्षानं निघाले होते.त्याचवेळी मेट्रोचा सिमेंट ब्लॉक रिक्षावर कोसळला. मुंबई फिरल्यानंतर दोन दिवसात रामधनी यादव उत्तर प्रदेशात जाणार होते. या घटनेची माहिती मिळताच रामधन यादव यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर एकच हंबरडा फोडला.
मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटना प्रकरणात MMRDA कडून उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना MMRDAच्या भरपाई धोरणानुसार 15 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याच सोबत जखमींचा संपूर्ण वैद्यकीय खर्च पूर्णपणे एमएमआरडीए करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
