शाळा सोडल्याच्या दाखल्यावर धर्माचा उल्लेख टाळा; पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्याध्यापकांना आदेश

1 min read

पिंपरी दि.१५:- प्रतिनिधी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर (LC) जात नमूद करताना त्यापुढे धर्माचा उल्लेख केल्यास असा दाखला जात पडताळणी साठी अवैध ठरण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील सर्व शाळांना कडक सूचना दिल्या आहेत. दाखल्यांवर केवळ ‘जमातीचा’ उल्लेख करावा, धर्माचा उल्लेख टाळावा, असे आदेश प्रशासन अधिकारी ज्योत्स्नी शिंदे यांनी दिले आहेत. नेमका विषय काय? अनेक शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांचे दाखले देताना ‘हिंदू-भिल्ल’, ‘हिंदू-ठाकूर’, ‘हिंदू-कोळी महादेव’ असा उल्लेख केला जातो. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या १२ जानेवारी २००० रोजीच्या परिपत्रकानुसार, अशा प्रकारे धर्माचा उल्लेख करून दिलेले जातीचे दाखले वैध समजले जात नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात जात पडताळणी (Caste Validity) करताना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो.मुख्याध्यापकांना सूचना महापालिकेच्या शिक्षण विभागाने (प्राथमिक) यासंदर्भात परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे की:
शहरातील सर्व मनपा, खासगी, अनुदानित आणि विना अनुदानित प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी शासन निर्णयाचे पालन करावे.शाळा सोडल्याच्या दाखल्यावर नोंदी करताना शासन परिपत्रक क्र. एसटीसी-१०९९/प्र.क्र.३१/का-१० नुसारच कार्यवाही करावी.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जात आणि जमातीच्या नोंदी अचूक असाव्यात.या निर्णयामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळवताना होणारा त्रास कमी होणार आहे. महापालिकेच्या या भूमिकेचे अनुसूचित जमाती शिक्षक कर्मचारी संघटनेने स्वागत केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!