50 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान हिंद महासागरात कोसळले

1 min read

नवी दिल्ली दि.११:- सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे मंगळवारी एक थरारक विमान अपघात घडला. अदन अद्दे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच 50 प्रवाशांना घेऊन जाणारे स्टार स्काय एअरलाइन्सचे विमान हिंद महासागरात कोसळले.मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसी निर्णया मुळे या भीषण अपघातात एकही जीवितहानी झाली नाही. स्टार स्काय एअरलाइन्सचे हे विमान मंगळवारी दुपारी मोगादिशू येथील अदन अद्दे विमानतळावरून गुरिएल भागाच्या दिशेने रवाना झाले होते. विमान अजून पूर्ण उंचीवर पोहोचले नव्हते, तोच अचानक तांत्रिक बिघाड झाला. इंजिनने काम करणे बंद केले आणि विमानाचा ताबा सुटू लागल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्या वेळी विमानात 50 प्रवासी होते. परिस्थितीची गंभीरता ओळखत पायलटने विमान पुन्हा विमानतळाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र रनवेपर्यंत पोहोचणे अशक्य असल्याचे लक्षात येताच त्याने मोठा निर्णय घेतला.पायलटने विमानतळालगत असलेल्या हिंद महासागराच्या किनाऱ्याच्या दिशेने विमान वळवले. लँडिंग अत्यंत भीषण होती. धडकेत विमानाचे पंख तुटून वेगळे झाले आणि विमान नियंत्रणाबाहेर जाऊन समुद्रकिनाऱ्याजवळ कोसळले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!