विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी गिरवले व्यावहारिक ज्ञानाचे धडे;आनंद यात्रेतून ७५ हजारांची उलाढाल
1 min read
साकोरी दि.२४:- विद्यानिकेतन संकुलात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्केट डे आणि फन फेअर या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता नर्सरी ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सुमारे १२० हून अधिक स्टॉल्स उभारून यामधून ७० ते ७५ हजार रुपयांची विद्यार्थ्यांनी उलाढाल केली.
या फन फेअरमध्ये लहानग्या विद्यार्थ्यांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी आपल्या कल्पकतेचा आणि कौशल्याचा उत्कृष्ट नमुना सादर केला.विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, विविध खायपदार्थ, चाट, आईस्क्रीम, थंड पेये, स्टेशनरी, हस्तकला वस्तू आदींचे आकर्षक स्टॉल्स उभारले होते.
प्रत्येक स्टॉल विद्यार्थ्यांनी स्वतः सजवून त्यावर किंमती लिहिल्या होत्या तसेच ग्राहकांशी संवाद साधत विक्री केली. या उपक्रमामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, पैशाचे महत्त्व, खरेदी-विक्रीची पद्धत, नफा-तोटा याची ओळख करून देणे हा होता. प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांनी पैशाची देवाण-घेवाण, हिशोब ठेवणे,
ग्राहकांशी वागणूक कशी असावी याचे धडे घेतले. त्यामुळे हा उपक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता शैक्षणिकदृष्ट्याही अत्यंत उपयुक्त ठरला. संपूर्ण संकुलाला जणू लघु बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त करून दिले होते. या कार्यक्रमाला साळवाडी गावच्या सरपंच कल्पना काळे, अणे गावच्या सरपंच प्रियांका दाते, प्रशांत दाते,
तात्यासाहेब भालेराव यांच्यासह विद्यानिकेतन संस्थेचे सर्वेसर्वा पी. एम. साळवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी सर्व स्टॉल्सना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीच्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव)
तसेच पी. एम. हायस्कूलचे प्राचार्य रमेश शेवाळे यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, आत्मविश्वासाचे व उपक्रमशीलतेचे विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे रुजतात, असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंदांनी मोलाचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य केले.
शिक्षकांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला. पालकवर्गानेही या उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. एकूणच मार्केट डे आणि फन फेअर हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिकवण देणारा, आनंददायी आणि अविस्मरणीय अनुभव ठरला.
