पारगावात बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश
1 min read
बेल्हे दि.१६:- पारगाव तर्फे आळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार झालेल्या ठिकाणी पाच ते सहा वर्षाचा नर जातीचा बिबट जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. सदर बिबट्याच्या तोंडातील लाळेचे नमुने घेतले असून पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती ओतूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन्य कांबळे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथील रामवाडी येथे ८ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना सोमवारी (दि.१५) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने १५ पिंजरे आणि १० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते.

या हल्ल्यात रोहित कापरे या मुलाचा मृत्यू झाला. यानंतर ग्रामस्थांनी नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची मागणी करत सरकारने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी केली. यानंतर जुन्नर व विभागाच्या वतीने या परिसरातील नरभक्षक बिबट्या

पकडण्यासाठी घटनास्थळी आणि परिसरात १५ पिंजरे लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर दहा ट्रंप कैमेरे लावण्यात आले आहेत.जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, ओतूरचे वनपरिक्षेत्राधिकारी चैतन्य कांबळे, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर आणि जुन्नरचे वनपाल,
वनरक्षक तसेच वनकर्मचारी यांनी घटनास्थळी सोमवारी सायंकाळी १५ पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावले. या पिंजऱ्यामध्ये हा बिबट मंगळवार दिनांक १६ रोजी सायंकाळच्या सुमारास जेरबंद झाला.

