सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ७१७ कोटींचा निधी वितरीत

1 min read

मुंबई दि.८:- नाशिक त्र्यंबकेश्वर येथे १३ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. एकीकडे तपोवनातील साधुग्रामचा वाद पेटला असतानाच सरकारने कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी ७१७ कोटींच्या निधीचा दुसरा हप्ता वितरीत केला आहे. हा निधी कुंभमेळा आराखड्यातील विकासकामांवरत खर्च करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.नाशिकमध्ये १३ ऑक्टोबर २०२६पासून सुरू होणारा सिंहस्थ कुंभमेळा २४ जुलै २०२८ पर्यंत सुरू राहणार आहे. यासाठी सरकारकडून विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. यासाठी २०२५-२६ या कालावधीत करण्यात येणाऱ्या कामांसाठी सरकारकडून १००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण निर्माण करण्यात आले असून या प्राधिकरणाला अर्थसंकल्पीय तरतूदींपैकी २८३ कोटी रुपयांचा निधी १५ ऑक्टोबर रोजी वितरित करण्यात आला होता. उर्वरित ७१७ कोटी रुपयांचा निधी वित्त विभागाच्या मान्यतेनंतर वित्तरित करण्याचा निर्णय नगर विकास विभागाकडून घेण्यात आला. याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.कुंभमेळ्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामाचा आराखडा राज्य सरकारकडून यापूर्वीच मंजूर करण्यात आला असून. त्याच कामावर हा निधी खर्च करण्यात यावा असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. निधीचा वापर करताना यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना,निकष तसेच अटींचे संपूर्ण पालन करण्याची जबाबदारी ही नाशिक -त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच नाशिकचे विभागीय आयुक्त यांची राहणार आहे. संबंधित कामांना सक्षम प्राधिकरणाची प्रशासकीय अशिण तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतरच निधी संबंधित यंत्रणांना वितरीत करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. केंद्र व राज्य सरकारची तरतूद केंद्र आणि राज्य सरकार मार्फत कुंभमेळ्यासाठी आवश्यक विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून २९७ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग व अन्य रस्त्यांसाठी २ हजार ४५८ कोटी (एकूण १० कामे), राष्ट्रीय महामार्गाच्या २९४ किलोमीटरच्या ७ कामांसाठी ४ हजार ७४९ कोटी रुपये, आठ रेल्वे स्थानकांच्या ८६ कामांसाठी १ हजार ४७६ कोटी रुपये, नाशिकमधील राम काल पथसाठी ९९ कोटी १४ लाख रुपये, ओझर येथील विमानतळाच्या विकासासाठी ६४० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.राज्य शासनाने रस्ते विकासासाठी २ हजार २७० कोटी ६१ लाख रुपये आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणच्या पहिल्या टप्प्यातील विविध विकास कामांसाठी ५ हजार १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात नाशिक महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प, रस्ते, पूल, ओएफसी केबल, सीसीटीव्ही अग्निशमन आदी कामांसाठी ३ हजार १६ कोटी २० लाख रुपये, जलसंपदा विभागाला घाट बांधणे, बॅरेज, उपसा सिंचन योजनेसाठी ७५० कोटी ५४ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!