न्यायालयात ठेवलेली ‘गीता’ शाळेत आली तर गुन्हेगारी थांबेल:- ह.भ.प. अशोक महाराज शिंदे

1 min read

शिरूर दि.३:-भगवान दत्तात्रय जन्मोत्सवानिमित्त सविंदणे येथे सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी ह.भ.प. अशोक महाराज शिंदे (आणे) यांच्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक कीर्तन उपदेशाने भाविकांना अंतर्मुख केले. समाजातील वाढता नैतिक ऱ्हास, शिक्षणातील संस्कारांची कमतरता आणि शैक्षणिक बाबतीत महत्त्वाचे उपदेश महाराजांनी केले आहे.कीर्तनादरम्यान त्यांनी केलेले एक विधान विशेष गाजले “शाळेत नसणारे ग्रंथ न्यायालयात ठेवले जातात… न्यायालयातील गीता जर शाळेत आली, तर कोर्टात जाण्याचीच वेळ येणार नाही.”हे विधान करताना महाराज म्हणाले की, गीतेतील मूल्ये, सत्य, धर्म, कर्तव्य आणि विवेक या गोष्टी शिक्षणात रुजल्या तर समाजातील गुन्हेगारी आपल्या मुळापासून कमी होईल. ते पुढे म्हणाले, “गीता हे अत्यंत पवित्र ग्रंथ असून आज न्यायालयात शपथ-विधीसाठी त्याचा उपयोग होतो. पण तोच ग्रंथ जर मुलांच्या मनात रुजला, शालेय शिक्षणात आला, तर न्यायालयांचे दरवाजे ठोठावण्याची वेळच येणार नाही. कारण संस्कार आणि समज वाढली की चुकीचे मार्ग आपोआप दूर होतात.”महाराजांनी पालकांचे संस्कार, युवावर्गाचा संभ्रम, स्वार्थी प्रवृत्तीचा वाढता प्रभाव, भक्ति आणि सदाचाराचे महत्त्व यावरही हृदयाला भिडणारे मार्गदर्शन केले. उदाहरणांसह दिलेल्या त्यांच्या उपदेशामुळे सभामंडप वारंवार टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले.भक्तांनी “दत्तात्रय महाराज की जय” अशा घोषणांनी वातावरण अधिकच भारावून टाकले.अखंड हरीनाम सप्ताहात दररोज वाढत चाललेली भाविकांची उपस्थिती आणि उत्सवातील अध्यात्मिक वातावरणामुळे दत्तजयंती साजरी करण्याचा आनंद अधिकच द्विगुणित झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!