घेवड्याच्या पिकात ४ गुंठ्यात ४ महिन्यात ४० हजार रुपये नफा

1 min read

आळेफाटा दि.१:- आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानदेव बामणे या शेतकऱ्याने अवघ्या ४ गुंठ्यात उत्तम शेती करत घेवड्याच्या पिकातून ४० हजार रुपयांचा नफा मिळवला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की आळे येथील ज्ञानेश्वर बामणे हे शेतकरी आपल्या छोट्या क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी चार महिन्यापूर्वी आपल्या चार गुंठे क्षेत्रांमध्ये घेवड्याची लागवड केली होती. या शेतात आधी मका होती. मका पीक काढून त्यांनी शेतात नांगरणी केली. ट्रॅक्टर च्या सहाय्याने रोटर मारून वाफे बनवले. गेल्या वर्षी त्यांनी पिकवलेल्या घेवड्याचे बी त्यांनी धरून ठेवले होते. घरातील पावशेर बी त्यांनी या क्षेत्रामध्ये लावले. लागवडी पूर्वी व नंतरही त्यांनी शेतात शेणखत टाकले. दोन-तीन वेळा औषधांची फवारणी केली. पिकाची निगा राखल्यामुळे चांगल्या शेंगा आल्या.शेणखत व औषधाचा त्यांना नऊ ते दहा हजार रुपये खर्च आला. घरीच मजुरी करून त्यांनी चांगले पीक फुलवलं.घरच्या जवळच शेत असल्याने वेळोवेळी पिकाची त्यांनी काळजी घेतली. शेंगांची घरीच तोडणी केली.किलोला ६० ते ७० रुपये दराने त्यांनी आळेफाटा येथे घेवढ्याच्या शेंगांची विक्री केली. आत्तापर्यंत त्यांनी ५० हजार रुपयांच्या शेंगा विकल्या आहेत. अवघ्या चार महिन्यात त्यांना चार गुंठ्यामध्ये खर्च वजा करून ४० रुपयाचा नफा मिळवला आहे. अजूनही २० ते २५ दिवस शेंगांची तोडणी चालू राहणार आहे. शेतीला शेणखत टाकल्याने चांगले उत्पादन निघाले असल्याची माहिती यावेळी ज्ञानदेव बामणे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!