TET: टीईटीच्या परीक्षा केंद्रांबाबत महत्त्वाचा निर्णय…
1 min read
पुणे दि.६:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती माध्यमांच्या उमदेवारांची संख्या कमी असल्याने त्यांच्यासाठी परिषदेमार्फत विशिष्ट ठिकाणीच परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत. त्यामुळे २३ नोव्हेंबर रोजी या परीक्षा केंद्रावर जाऊन उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. यात पहिली ते पाचवी या इयत्तांसाठीची परीक्षा (एक) सकाळच्या सत्रात, तर सहावी ते आठवी या इयत्तांसाठीची परीक्षा (दोन) दुपारच्या सत्रात होणार आहे.
या परीक्षेसाठी उमेदवारांना मराठी, इंग्रजीसह अन्य भाषा माध्यम म्हणून निवडता येतात. त्यानुसार ४ लाख ७९ हजारांहून अधिक उमेदवारांनी त्यासाठी नोंदणी केली आहे. मात्र, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती अशा माध्यमांतून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी असल्याने या उमेदवारांसाठी काही जिल्ह्यांतच परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे.
परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, बंगाली माध्यमातून परीक्षा देणाऱ्या मुंबई, पालघर, पुणे, धुळे, नंदुरबार, जालना जिल्ह्यातील उमेदवारांसाठी पुणे, तर नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी चंद्रपूर येथे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
कन्नड माध्यमातून परीक्षा देणाऱ्या मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ठाण्यामध्ये, तर पुणे, सोलापूर, हिंगोली, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सोलापूरमध्ये, तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सांगलीत परीक्षा केंद्र राहणार आहे.
तेलुगू माध्यमातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी पुणे येथे, गुजराती माध्यमाच्या मुंबई, ठाणे, पालघर, पुणे येथील उमेदवारांसाठी ठाणे येथे, तर नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, बुलडाणा येथील उमेदवारांसाठी नंदूरबार येथील परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सेवेत असलेल्या, तसेच पदोन्नती हवी असलेल्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य असल्याचा निर्णय अलीकडेच दिला. त्यानंतर कार्यरत असलेल्या, पण टीईटी पात्र नसलेल्या शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या अनुषंगाने शिक्षक, संघटनांकडून आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर रोजी घेतल्या जाणाऱ्या टीईटीच्या नोंदणीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
