बोरी – खोडद गटात उमेदवारी मिळविणे आव्हान; बैठकांचा तडाखा सुरू
1 min read
बोरी दि. दि.३१:- बोरी- खोडद हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर बोरी बुद्रुक गणासाठी सर्वसाधारण व खोडद गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव असे आरक्षण आले आहे. सध्या पक्षाच्या तसेच पुढारी मंडळीच्या बैठका सुरू असून कोणाला उमेदवारी मिळेल हेच आव्हान सध्या इच्छुकांसमोर आहे.
या नवीन गटात जिल्हा परिषदेसाठी व पंचायत समितीसाठी इच्छुक संख्या मोठी आहे. परंतु इच्छुकांना प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाणे अवघड असल्याने उमेदवार निवडताना प्रत्येक पक्षाला उमेदवाराचा प्रत्येक गावात असणारा जनसंपर्क,झालेली विकास कामे,पुढील करावयाची विकास कामे,
परिसराची भौगोलिक रचना, इतिहास या सर्व गोष्टींची जाण असणाऱ्याचा विचार करणे गरजेचे राहणार आहे.बोरी बुद्रुक गणातून पंचायत समितीसाठी पारगाव, शिरोली, बोरी, औरंगपूर गावांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
तर खोडद गणात खोडद, वडगाव, बोरी बुद्रुक, कांदळी गावातून विद्यमान अथवा माजी सरपंच किंवा सदस्य,तरुण नेतृत्व यांना संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
———
चौकट
लढत राष्ट्रवादी-शिवसेना (उबाठा) पक्षात
राज्यात शिवसेना दोन गट, राष्ट्रवादी काँग्रेस दोन गट तसेच काँग्रेस अशी परिस्थिती असताना कोण कुणाच्या गळ्यात हात घालून निवडणुकीला सामोरे जाणार हे पुढील काळच ठरविणार आहे. असे असले तरी बोरी खोडद गटात खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उबाठा) यांच्यातच होईल हे मात्र नक्की असल्याचे दिसत आहे.
———
या नव्या नव्या बोरी – खोडद गटात जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांची संख्या मोठी झाली आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने चुरस वाढली आहे. जिल्हा परिषद गटासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सुन कविता संदीपान पवार, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर गाडगे
यांच्या पत्नी व विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेच्या माजी संचालिका संगीता भास्कर गाडगे, बोरी खुर्द गावच्या सरपंच कल्पना वैभव काळे, वडगाव कांदळीच्या आदर्श सरपंच उल्का श्रीकांत पाचपुते, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे यांच्या पत्नी जयश्री खंडागळे, बोरी गावच्या माजी सरपंच पुष्पा अमोल कोरडे,
बोरी गावच्या विद्यमान सदस्या कोमल युवराज कोरडे, वडगाव कांदळीच्या माजी सरपंच माधुरी सचिन निलख इच्छुक आहेत.तर पंचायत समितीसाठी पारगावचे सामाजिक कार्यकर्ते संभाजी चव्हाण, पारगाव चे उपसरपंच रामचंद्र डुकरे, निमगावचे अजित गाडगे, वडगाव कांदळीचे माजी सरपंच रामदास पवार यांच्या पत्नी मनीषा पवार,
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे जुन्नर तालुका अध्यक्ष रोहित राजेंद्र नरवडे, प्रगती सुदर्शन बडे इच्छुक आहेत. या व्यतिरिक्त काही जणांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती लढण्याची तयारी दाखवली आहे परंतु त्यांनी अद्याप आपलं नाव चर्चेत ठेवलं नाही. जिल्हा परिषद लढवणाऱ्या इच्छुक उमेदवाराने आपले
पंचायत समिती उमेदवार कोण असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. आतून मतदारांशी वैयक्तिक गाठीभेटी सुरू ठेवल्या आहेत. ऐनवेळी पक्षाचे तिकीट कुणाला मिळते हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. तर या नव्या जिल्हा परिषद गटाचा व गणांचा पुढील पाच वर्ष कोण गाडा सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
