१ हजार ३५२ कोटीच्या विविध विकासकामांचे ऑनलाईन भूमिपूजन व लोकार्पण
1 min read
फलटण दि.२७:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण येथे नीरा देवघर प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालवा दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभासह १ हजार ३५२ कोटी रुपये रकमेच्या विविध विकासकामांचे ऑनलाईन भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
फलटण-शिंगणापूर रस्त्यावरील नाईकबंबवाडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये एक मोठा (मेगा) औद्योगिक प्रकल्प देण्यासह तालुका व परिसरातील विविध विकास कामे सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सर्व सुविधा फलटण शहरात आल्या आहेत. प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे, न्यायालय आदींच्या माध्यमातून नागरिकांचे जीवन सुकर होणार आहे. येथील विविध विकास कामांना चालना दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच कृषी क्षेत्रासह, बचत गट, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते.
