लाडकी बहीण योजनेत मोठा भ्रष्टाचार; हजारो पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ
1 min read
मुंबई दि.२२:- गेल्या वर्षभरात तब्बल १२ हजार ४३१ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जावर उत्तर देताना सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे लाभार्थी पुरुषांकडून अद्याप पैशांच्या वसुलीसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून या सर्व लाभार्थी पुरुषांची नावे हटवण्यात आली आहे.
त्याचबरोबर एकूण ७७ हजार ९८० अपात्र महिला लाभार्थ्यांनाही यादीतून वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पुरुष व महिला लाभार्थ्यांनी गैरव्यवहार करून अनुक्रमे १२ व १३ महिने योजनेचा लाभ पदरात पाडून घेतल्याचं स्पष्ट झाले आहे.
म्हणजेच, जवळपास वर्षभर दर महिन्याला मिळणारे १५०० रुपये या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत होते. यातून सरकारी तिजोरीला पुरुष लाभार्थ्यांसाठी २४.२४ कोटी तर अपात्र महिला लाभार्थ्यांमुळे १४०.२८ कोटींचा भुर्दंड बसला आहे.
