सर्व शाळांमध्ये राज्यगीत गायन होते की?:- शिक्षण मंत्री दादा भुसे
1 min read
मुंबई दि.१०:- शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील सर्व शिक्षण मंडळाच्या समन्वयक, प्राचार्य आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची सहविचार बैठक घेतली. राज्य शिक्षण मंडळासह अन्य सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन व अध्यापन अनिवार्य असून राज्यगीत गायन सुद्धा केले जावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
आयसीएसई, सीबीएसई, केंब्रिज मंडळातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणपत्रिकेवरही मराठी हा विषय आला पाहिजे. त्यासाठी विविध मंडळांशी पत्रव्यवहार केला जाईल. राज्य मंडळाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यासंदर्भातील अभ्यासक्रमाचा आयसीएसई बोर्डाच्या पुस्तकामध्येही समावेश झाला पाहिजे.
राष्ट्र प्रथम ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जावी. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाची देखील प्रभावी अंमलबजावणी करावी. उत्तम सुविधा असणाऱ्या अन्य बोर्डाच्या शाळांनी मराठी माध्यमाच्या शाळांनाही मार्गदर्शन करावे, असेही मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल,
शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांच्यासह सीबीएसई, आयसीएसई, इंटरनॅशनल बोर्डाचे विविध समन्वयक व शाळांचे प्राचार्य आदी यावेळी उपस्थित होते.
